मुंबई - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन मेहनत घेताना दिसत आहे. अशा स्थितीत वेगवेळ्या सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्याकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टतर्फे 500 कोटी तर टाटा सन्सने 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. म्हणजे टाटा ग्रुपने एकूण 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
टाटा ट्रस्टने एक प्रसिद्धी पत्राद्वारे याची माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच या काळात कोणाही उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे. अशातच काही सामाजिक संघटानाही मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत.
कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी रतन टाटांनी केलेली मदत ही खूप मोठी आहे. राज्यातही विविध पक्षांतर्फे मदतीचे हात पुढे येत आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचे वेतन कोरोनाच्या लढाईत मदतीसाठी दिले आहे.