चंदीगढ - हरियाणाच्या पंचकुलामध्ये पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अत्याचार करून तिची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पंचकुलाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नरेंद्र सुरा यांनी अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने खटल्याच्या अवघ्या दोन महिन्यांत दोषी आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे जिल्हा अॅटर्नी यांनी ऐतिहासिक निर्णय म्हणून वर्णन केले आहे.
न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम 6 नुसार 20 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड, भादंवि कलम 376 नुसार 20 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड आणि भादंवि कलम 302 नुसार जन्मठेपेची ( जन्मभर नाही, परंतू राज्याच्या धोरणानुसार) शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. जिल्हा अॅटर्नी पंकज गर्ग म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणात ऐतिहासीक निर्णय दिला आहे. कारण असे अपराध करणाऱ्या गुन्हेगारांना यामुळे वचक बसेल.
काय आहे संपूर्ण प्रकरण...
13 मे 2019 ला ही घटना घडली होती. पंचकुलाच्या सेक्टर 14 मध्ये लिटील फ्लॉवर कॉन्वेंट शाळेच्या जवळील मोकळ्या जागेत आरोपीने पीडित चिमुकलीवर अत्याचार करून डोक्यात दगड घालून निर्घूणपणे हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.