लखनऊ : उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी बलात्कार प्रकरणी बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. पालकांनी आपल्या मुलींवर चांगले संस्कार केले, तर बलात्कारासारख्या घटना थांबू शकतात, असे या आमदारांचे म्हणणे आहे.
"अशा घटना शासन आणि तलवारींनी नाही, तर केवळ संस्कारांनीच थांबू शकतात. सर्व आई-वडिलांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या तरुण मुलींना एका संस्कारी वातावरणात, शालीन आचरण शिकवावे." असे मत या आमदारांनी व्यक्त केले. "जर सरकारचा धर्म (कर्तव्य) सुरक्षा देणे आहे; तर कुटुंबाचा धर्म आपल्या मुलांना संस्कार शिकवणे आहे. सरकार आणि संस्कारांच्या एकत्रित प्रयत्नांनीच आपला देश सुधारु शकेल" असेही ते यावेळी म्हणाले.
सिंह यांचा मतदारसंघ असलेल्या बलियामध्ये बुधवारी एका १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. शुक्रवारी तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.