लखनौ - लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर भाजप चीनमधून दाढी काढण्याची मशिन आणणार आहे. त्यानंतर जवळपास १० ते १२ हजार मुस्लिमांना बळजबरीने हिंदू धर्मात प्रवेश करण्यास भाग पाडणार, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते रणजीत बहादुर श्रीवास्तव यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका सभेला संबोधित करताना गुरुवारी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
लोकसभा निडवणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी पार पडले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी विविध पक्षांनी कंबर कसलेली आहे. यातच भाजप नेते मात्र एकामागून-एक वादग्रस्त वक्तव्य करताना समोर येत आहेत. त्यातच आता श्रीवास्तव यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मागील ५ वर्षामध्ये मुस्लिमांचे मानसिक धैर्य खचवले आहे. मुस्लिमांना संपवायचे असेल तर आपणाला मोदींना निवडून देणे महत्वाचे आहे. अन्यथा त्यांची वाढती संख्या आणि मतदानाच्या हक्काचा वापर करून ते आपणाला संपवतील, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले. आपण जर मोदींना मत दिले नाही. तर याचा परिणाम भोगण्यास तयार रहा, असे वक्तव्याही त्यांनी यावेळी केले.
उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यामध्ये ६७.५५ टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर ६४ जागांसाठी मतदान प्रक्रिया शिल्लक आहे. या जागांसाठी पुढील ५ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. श्रीवास्तव यांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोग कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वी अली आणि बजरंगबली या मुद्यावरून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ७२ तासांसाठी प्रचारबंदीची शिक्षा आयोगाने दिली होती.