नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर बलिदानाच्या अपमानाचे जे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केले, असे संपूर्ण जगात यापूर्वी घडलेले नाही. १४ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पतंप्रधान मोदी एका उद्यानात चित्रपटासाठी चित्रीकरण करत होते, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
जेव्हा संपूर्ण देश जवानांबाबत दु:ख व्यक्त करीत होता, तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'डिस्कव्हरी' या वाहिनीसाठी चित्रीकरण करत होते. मोदी स्वत:च्या प्रचार आणि प्रसारात व्यस्त होते, असा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. मोदी सरकारला सत्तेच्या हव्यासापोटी मानवतेचा विसर पडला असल्याची टीकाही सुरजेवाला यांनी यावेळी केली.
२६/११ हल्ला आणि मोदी -
मोदी आणि शाह जोडीला दहशतवादावर राजकारण करण्याची वाईट सवय आहे. जेव्हा मुंबईवर २६/११ चा हल्ला होत होता, तेव्हा नरेंद्र मोदी तत्कालीन सरकारवर टीका करणाऱ्या एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. मोदींच्या पत्रकार परिषदेचे हे ठिकाण हल्ला झाला त्या ठिकाणापासून अगदी जवळ होते, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला. यावेळी त्यांनी मोदींच्या त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओही सादर केला.
काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी २०१९ ला उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान, त्यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या चित्रीकरणामध्ये भाग घेतला होता. लवकरच या वाहिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी दिसणार आहेत. हा कार्यक्रम उत्तराखंडच्या कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील प्राणी आणि उद्यानाची रूपरेखा यावर तयार होत आहे. कार्यक्रमातील काही दृश्यांचे मोदींच्या रुद्रपूर दौऱ्याच्या दिवशी चित्रीकरण करण्यात आले आहे. मोदी या चित्रीकरणासाठी कॉर्बेट उद्यानात ४ तास थांबले होते. यादरम्यान त्यांनी जंगल सफारीचाही आनंद घेतला. त्यांनी येथूनच मोबाईलवरून रुद्रपूरच्या जनतेशीही संवाद साधला.