हैदराबाद - देशात सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा रामोजी राव यांनी मंगळवारी कोरोना विरोधात लढा देण्यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांना प्रत्येकी १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची वैयक्तिकरीत्या भेट होऊ शकली नसल्याचे रामोजी राव म्हणाले. दोन्ही मुख्यमंत्र्याना त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी शुभेच्छा दिल्या असून दोन्ही राज्यातील नागरिकांचे स्वास्थ्य निरोगी राहील, अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान, 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्त्वाच्या माध्यम समूहांच्या प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत केली. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतचे चेअरमन रामोजी राव यांच्यासोबतही चर्चा केली होती. यावेळी रामोजी राव यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महत्त्वाचे तीन सल्ले दिले होते.
ईनाडू-रामोजी समुहाने यापूर्वीही अनेकदा नैसर्गिक संकटावेळी मदत केली आहे. केरळला 2018 मध्ये 'न भूतो न भविष्यति' अशा पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. अनेक लोक बेघर झाली होती. पुराने हाहाकार माजवल्यानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ईनाडू-रामोजी समुहाने हात पुढे केला. या मोहिमेंतर्गत अलाप्पुझा येथील विस्थापितांना तब्बल 121 घरे बांधून दिली होती. त्यांच्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात आले होते.