अयोध्या - राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. 5 ऑगस्टला शुभ मुहुर्तावर भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून यासाठीची तयारीही पूर्ण होत आली आहे. सकाळी 11 वाजता भव्य भूमीपूजनाचा कार्यक्रम सुरु होणार असून 200 व्हीआयपी गेस्ट येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चांदीची वीट ठेवून मंदिराचा पाया रचला जाणार आहे.
अयोध्येत होणार दिपोत्सव
अयोध्येमध्ये याआधी दिवाळीला 6 लाख दिवे शरयू नदीच्या किनारी लावून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला होता. राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने आता पुन्हा रामनगरीत दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अयोध्या नगरी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणार आहे.
मंदिराच्या ट्रस्ट्रने पाहुण्यांची यादी पाठवली पीएमओ कार्यालयाला
भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला अनेक हाय प्रोफाईल पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या सर्वांची यादी राम मंदिर ट्रस्टने प्रधानमंत्री कार्यालयाला पाठविली आहे. मात्र, यातील पाहुण्यांची नावे उघड केली नाहीत. 200 पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 50 च्या गटाने त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिल्या गटामध्ये देशातील प्रमुख साधू, संत आणि महंतांना बसण्यास जागा असेल. दुसऱ्या गटात राम जन्मभूमी चळवळीशी निगडीत व्यक्तींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर तिसऱ्या गटात उद्योगपती, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पाहुण्यांना बसण्याना बसण्याची व्यवस्था असेल. काही राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा कार्यक्रमाल उपस्थित राहणार आहेत.
दुरदर्शनवर पाहता येईल'लाईव्ह' प्रक्षेपण
कोरोनाच्या प्रसारामुळे काही ठराविक व्यक्तीच या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे भूमीपूजनाचा कार्यक्रम लाईव्ह करण्याची व्यवस्था मंदिराच्या ट्रस्टने केली आहे. त्यामुळे घरात बसून सर्वांना हा पवित्र सोहळा दुरदर्शनवर अनुभवता येणार आहे. काही शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनही बसविण्याचे प्रस्तावित आहे.
शुभ मुहुर्तला होणार भूमीपूजन
ज्योतिषशास्त्रानुसार भूमीपूजनाचा मुहुर्त 5 ऑगस्टला दुपारी 12:15:15 ते 12:15:32 ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 32 सेकंदांच्या आत चांदीची विट ठेवून पाया रचणार आहेत. ही वेळ शुभ असल्याने त्याच वेळी भूमीपूजन कऱण्याचे प्रस्तावित आहे. तसेच पंतप्रधान मोदी येण्याचा आत सर्व पूजा उरकून घेण्यात येणार आहे.
अयोध्येतील साकेत कॉलेजात हेलिपॅड
5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजेपर्यंत पंतप्रधान अयोध्येत हजर होतील. पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी साकेत कॉलेजात हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा करण्यात आली आहे. या ठिकाणापासून ते अयोध्या राम जन्मभूमीपर्यंतच्या मार्गावरील सर्व भिंती रामायनातील घटनांशी संबंधीत चित्रे रंगविण्यात येणार आहेत. या मार्गाने पंतप्रधानांचा ताफा कार्यक्रम स्थळी जाणार आहे.