नवी दिल्ली - राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे निवडणुका पुढे ढकल्यात आल्या होत्या. मात्र, 19 जूनला निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने 1 जूनला जाहीर केले. कोरोनामुळे सुरक्षेची काळजी घेत निवडणुका पार पडणार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमावलीचे निवडणूक काळात पालन केले जात आहे, की नाही हे पाहण्यासाठी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांनी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. आमदारांच्या आणि मतदानासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिसर सॅनिटाईज करण्यात यावा, अत्यावश्यक उपकरणे आणि आरोग्य कर्मचारीही निवडणूक स्थळी उपस्थित राहणार आहेत. आमदारांच्या सुरक्षेसाठी आणि निवडणुकीसाठी काय तयारी केली आहे, याचा अहवाल निवडणूक आयोगाने राज्यांकडे मागितला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
मतदानाच्या ठिकाणी फक्त आमदार आणि संबधीत कर्मचाऱ्यांना येण्याची परवानगी असणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे टेम्परेचर गनद्वारे तापमान तपासण्यात येणार आहे. तसेच मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटाझर ठेवण्यात येणार आहे.
17 राज्यातून 55 राज्यसभा सदस्यांसाठी निवडणूक आयोगाने 25 फेब्रुवारीला मदतानाची तारीख जाहीर केली होती. त्यातील 10 राज्यातील 37 जागा निवडणूक न घेताच निवडण्यात आल्या. त्यामुळे उरलेल्या 18 जागांसाठी 7 राज्यामध्ये 26 मार्चला निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या आता 19 जूनला होणार आहेत.