नवी दिल्ली - आजपासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा आज संसदेमध्ये उपस्थित केल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला असून कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले आहे. दरम्यान विरोधकांनी संसदेबाहेर निदर्शने करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संसदेच्या अधिवेशनाचे हे दुसरं सत्र 2 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
जातीय दंगल पेटवून दिल्लीमध्ये हिंसा घडवण्यात आली. यामध्ये अनेक जण ठार झाले. दिल्ली पोलीस सुरक्षा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात अपयशी का ठरली, असे मुद्दे आज संसदेमध्ये उपस्थित केले जाणार असून त्यावर चर्चा केली जाईल. दिल्ली हिंसाचारानंतर आता पश्चिम बंगालमध्ये शाह तसेच वातावरण तयार करत दिल्ली ते कर्नाटकपर्यंत ते लोकांचे विभाजन करत आहेत. भाजपच तुकडे-तुकडे गटाचे नेतृत्व करत आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
राजधानी दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. तसेच काँग्रेस प्रतिनिधी मंडळाने राष्ट्रपतींना निवेदन दिले होते आणि भाजपला राजधर्म पाळण्याची विनंती राष्ट्रपतींकडे केली होती. दिल्ली हिंसाचाराची घटना देशाला लाजवणारी घटना असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते.