नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल(शुक्रवार) लडाखचा दौरा करत सीमेवरील जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी ही भेट दिली. कोणतीही सत्ता भारताच्या इंचभर जमिनीला हात लावू शकत नाही, असा इशारा सिंह यांनी चीनचे नाव न घेता दिला. मात्र, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी संरक्षण मंत्र्यांवर टीका केली. संरक्षण मंत्र्यांची ही फक्त पोकळ शाब्दिक वल्गना असून चिनी सैनिक अजूनही भारतीय भूमीवर आहेत, असे ते म्हणाले.
भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या आढाव्यानुसार चिनी सैनिक अजूनही दीड किलोमीटर नियंत्रण रेषेच्या आत भारतीय भूमीवर आहेत. मे महिन्यात चिनी सैनिक 5 कि.मी भारतीय भूमीत आले होते, असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. भारतीय भूमीत कोणी घुसखोरी केली नाही, असे म्हणणे म्हणजे फक्त पोकळ शब्द आहेत. भारताच्या इंचभर जमिनीला कोणी हात लावू शकत नाही, हा सुद्धा संरक्षण मंत्र्यांचा फक्त पोकळ शाब्दिक इशारा आहे, असे चिदंबरम म्हणाले.
जो पर्यंत सरकार सीमेवरील सत्य परिस्थिती मान्य करत नाही, तोपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती आणने एक अशक्य ध्येय असेल, असे चिदंबरम म्हणाले. भारत चीन सीमेवरील तणाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. राजनैतिक, लष्करी आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. अनेक भागांतून चिनी सैनिक मागे सरकले आहे. मात्र, तणाव कमी करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून वेळखाऊ आहे, सीमेवरील परिस्थिती पडताळून पाहण्याची गरज लष्कराने व्यक्त केली आहे.