संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्याअगोदर राजनाथ सिंहांची हुतात्मा जवानांना आदरांजली - defence ministry
यावेळी राजनाथ सिंह यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, एअर चीफ मार्शल बीएस धनोआ, नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.
नवी दिल्ली - देशाचे नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज औपचारिकपणे संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारतील. त्याअगोदर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली.
यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, एअर चीफ मार्शल बीएस धनोआ, नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते. शुक्रवारी राजनाथ सिंह यांनी ट्विट केले होते, की 'उद्या सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहील, त्यानंतर औपचारिकपणे संरक्षण मंत्र्यालयाचा जबाबदारी स्वीकारेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी कटिबद्ध आहे.
मागील मोदी सरकारमध्ये सिंह यांच्याकडे गृहमंत्रालय होते. यावेळी गृहखाते भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना दिले आहे. तर, निर्मला सितारमण यांनी सांभाळलेले संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंह यांना देण्यात आले आहे. आता निर्मला सितारमण यांना अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवीन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. तिन्ही सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाच्या कामात वेग आणने. चीन आणि पाकिस्तानच्या सीमाभागात शांतता ठेवणे हे देखील त्यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.