श्रीनगर ( जम्मू काश्मीर) - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसाच्या लडाख आणि काश्मीर दौऱ्यावर आहेत. काल लडाख येथील जवानांची भेट घेतल्यावर आज ते अमरनाथ मंदिरात जावून दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील असणार आहेत.
राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी पूर्व लडाखमध्ये चीन सीमेलगत असलेल्या लुकुंग येथे भेट दिली. लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी लुकुंग पोस्ट येथील जवानांशी संवाद साधला.
दोन्ही देशांमध्ये आता तणाव निवळण्यासाठी विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. भारत-चीन सीमावाद सुटला पाहिजे. मात्र, किती प्रमाणात सुटेल याची खात्री देऊ शकत नाही. दोन्ही देशांतील वाद सोडविण्यासाठी भारताने राजकीय आणि मुसद्देगिरीवर भर दिला आहे. भारताने आत्तापर्यंत कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. आम्हाला शांतता हवी आहे. देशातील कोणतीही शक्ती भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करू शकत नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी चीनचे नाव न घेता दिला.
भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान दरम्यान झालेल्या चकमकीत आपल्या जवानांनी बलिदान दिले. मला तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला, तसेच शूर जवानांना गमवल्यामुळे मला दु: खही आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असेही ते म्हणाले
दरम्यान जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची माहिती मिळत असल्याचे आज (शुक्रवार) लष्कराने म्हटले आहे. मात्र, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचा विश्वास लष्कराकडून देण्यात आला आहे. जानेवारीपासून लष्कराने काश्मीर खोऱ्यात सव्वाशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यासाठी अनेक ऑपरेशन राबविण्यात आले असून त्यात लष्कराला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.