नवी दिल्ली : १९७१साली झालेल्या ऐतिहासिक अशा भारत-पाकिस्तान युद्धाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिल्लीच्या विजय स्तंभावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अभिवादन केले. यासोबतच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी या युद्धामध्ये वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
शौर्याचा नवा इतिहास..
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही दलांना विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. १९७१मध्ये भारतीय जवानांनी शौर्याचा नवा इतिहास लिहिला होता, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. त्यांच्या या शौर्यातून सर्व भारतीयांना प्रेरणा मिळते. देश या जवानांना कधीही विसरणार नाही, असेही सिंह म्हणाले.
जगाच्या नकाशामध्ये झाला मोठा बदल..
१९७१मध्ये याच दिवशी भारतीय सैन्याने आपल्या शौर्याने जगाचा नकाशा बदलला होता. या गोष्टीची जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद केली जाईल. या विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
विजय दिन..
१९७१च्या भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात भारताच्या विजयाने पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. भारताच्या कित्येक मोठ्या विजयांपैकी हा एक होता. या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानवरील या मोठ्या विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षी १६ डिसेंबरला विजय दिन साजरा केला जातो.