जयपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सांगण्यात येत आहे. फिजिकल आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना पोलीस वेळोवेळी 'प्रसाद' देताना दिसून येतात. मात्र, राजस्थानच्या जोधपूरमध्ये चक्क पोलिसांनीच फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे समोर आले आहे.
जोधपूरच्या देवनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलचा वाढदिवस चक्क कार्यालयातच करण्यात आला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलिसांनी मास्कही घातलेला नाही. तसेच, तेथे नाचगाणीही सुरू असताना दिसून येत आहे.
एकीकडे राजस्थान सरकार कोरोनाशी लढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करत आहे. तर, दुसरीकडे हे कोरोना योद्धेच नियमांना धाब्यावर बसवताना दिसून येत आहेत. आता या पोलिसांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : प्रवाशांना कोरोनापासून विमा संरक्षण देणार 'स्पाईस जेट'