नवी दिल्ली - राजस्थानात १३१० शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. गृह राज्यमंत्री नित्यांनद राय यांनी ही माहिती दिली. 'यापैकी ८२ जणांना राजस्थान सरकार, १११३ जणांना जोधपूरचे जिल्हाधिकारी, ७ जणांना जैसलमेर आणि १०८ जणांना जयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे,' असे ते म्हणाले.
'राजस्थानातील जोधपूर, जैसलमेर आणि जयपूरसह १६ जिल्हे आणि ७ राज्यांमध्ये कायदेशीर प्रवाशांशी संबंधित पंजीकरण किंवा प्राकृतिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत,' अशी माहिती राय यांनी एका लिखित उत्तरात दिली आहे.
'या राज्यांमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या ६ मुस्लिमेतर समुदायांना भारतीय नागरिकत्व बहाल करता येते. याअंतर्गत राजस्थान सरकारमध्ये जोधपूर, जयपूर आणि जैसलमेर या ३ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी १३१० अप्रवासींना भारताचे नागरिकत्व दिले आहे,' असे राय यांनी सांगितले.
९ जानेवारीला लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले होते. याअंतर्गत डिसेंबर २०१४ आधी बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या मुस्लिमेतरांना या विधेयकानुसार नागरिकत्व बहाल करता येते. मात्र, राज्यसभेत हे विधेयकाला विरोध करण्यात आला आहे.