हैदराबाद : राजस्थान एटीएस आणि सायबराबाद पोलीस यांच्या संयुक्त कामगिरीमध्ये आयपीएलचे बेटिंग रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी मुख्य आरोपीला जयपूरमधून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर आरोपींना हैदराबादच्या सायबराबादमधून अटक करण्यात आली.
हैदराबादच्या गच्चिबावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंडिन प्रिमिअर लीग (आयपीएल) या क्रिकेट स्पर्धेवर बेटिंग म्हणजेच सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मधापूरच्या एका स्पेशल ऑपरेशन्स टीम (एसओटी)ने सोमवारी सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ६५,३३० रुपये रोख रक्कम, एक बेटिंग बोर्ड, चार लॅपटॉप, दोन टॅब्लेट्स, ४६ मोबाईल फोन, सहा लँडलाईन फोन आणि एक टीव्ही असे साहित्य जप्त केले आहे. या सातपैकी सहा जण राजस्थानचे तर एक बिहारचा आहे.
यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे उघड झाले, की यांचे काही साथीदार बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्येही आहेत. सट्टेबाजी करण्यासाठी हे लोक एका बेटिंग अॅपची मदत घेत. यामध्ये अशोक कुमार आणि गणेश हे सूत्रधार असल्याचे समोर आले असून, या रॅकेटमधील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : हरियाणाच्या सुधारगृहातून १७ बालगुन्हेगार पळाले, तुरुंग कर्मचाऱ्यांवर केला हल्ला