सवाईमाधोपूर - राजस्थानातील सवाईमाधोपूर जिल्ह्यातील बरवाडाजवळ रविवारी भीषण अपघात झाला. येथे ४-५ टेम्पो बरवाडा येथून मंडावरा येथे वरात घेऊन निघाले होते. बरवाडाजवळ एका वळणावर सर्वांत पुढे चालणारा टेम्पो अचानक पलटला. यात बसलेले लोक त्याखाली दबले गेले. या अपघातात ८ महिलांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला.
टेम्पो अचानक पलटी झाल्यानंतर त्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. गाडीखाली दबल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी गंभीररीत्या जखमी झालेल्या ४ जणांनी सवाईमाधोपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. या अपघातात ८ महिलांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. २५ हून अधिक जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पलटलेल्या टेम्पोमध्ये महिला, तरुणी आणि लहान मुलीच होत्या.
सध्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात उपचारांसाठी पुरेशी उपकरणे मिळाली नसल्याचे जखमींच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या घटनेविषयी कोणतेही गांभीर्य दाखवले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना बोलावून घेऊन जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.