रायपूर - कटघोरा सध्या छत्तीसगढमधील कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. कटघोरामध्ये आतापर्यंत कोरोनाचे तब्बल २४ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संकटाने कटघोरामधील एका कुटुंबाला घेरले आहे. या कुटुंबातील एकापाठोपाठ ५ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. ज्यात दोन महिलांचाही समावेश असून या महिलांना लहान मुलीदेखील आहेत.
अशात या माता इच्छा असूनही आपल्या मुलांना हात लावू शकत नाहीत. शिवाय घरातील इतर सदस्यही बाधित असल्याने या लहानग्यांचा सांभाळ करणेही अवघड आहे. अशात या कुटुंबाच्या मदतीसाठी एम्स रुग्णालय पुढे सरसावले आहे. या रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात परिचारिका या बाळांना दूध पाजत आहेत. हा फोटो पाहून कोणीही भावनिक होऊन जाईल.
मुलींचा कोरोना अहवाल निगेटीव्ह -
या दोन्हीतील एक मुलगी २२ महिन्यांची तर एक ३ महिन्यांची आहे. जेव्हा महिलेला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा ती आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन आली होती. यावेळी आरोग्य विभागाने या दोन्ही मुलींचीही कोरोना टेस्ट केली. या दोघींचाही अहवाल कोरोना निगेटीव्ह आला आहे.
वडील अडकलेत दुसऱ्या राज्यात -
महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलींच्या आजीला त्यांच्या देखरेखीसाठी बोलवले गेले. मात्र, आजीचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला. तर त्यांच्या मामाचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे. या मुलींचे वडील कामानिमित्त दुसऱ्या राज्यात गेले होते. मात्र, अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले. अशात मुलींची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही.
रुग्णालय आले मदतीस धावून -
एम्स रुग्णालय प्रशासनाने या संकटाच्या काळात माणुसकी दाखवत या दोन्ही मुलींची काळजी स्वतःच घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयातील परिचारिका दोन्ही मुलींना पीपीई कीटद्वारे दूध पाजत आहेत