नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या. मात्र, प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. रेल्वे विभागाने पुन्हा एकदा आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ३० जूनपर्यंतची सर्व प्रवासी तिकिटे रद्द केली आहेत.
प्रवासी तिकिटे रद्द केल्याने ३० जून २०२० पर्यंत रेल्वे धावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य वेळी लोक १२० दिवसांपूर्वी रेल्वेचे आरक्षण तिकीट बुक करू शकतात. लॉकडाउन लागू होण्यापूर्वी सुद्धा लोकांनी या कालावधीसाठी तिकीट बुक केले होते. त्यांचीच तिकीटे आता रद्द करण्यात आली आहेत. रद्द झालेल्या सर्व तिकिटांना पूर्ण परतावा देण्यात येणार आहे.