नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. मात्र त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना, केंद्राकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय रेल्वे 152 श्रमिक विशेष गाड्या महाराष्ट्रात उपलब्ध करण्यास तयार आहे. राज्याकडे असलेल्या प्रवाशांची आणि गाड्यांची यादी त्वरित पाठवण्याचे आवाहन पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले.
पीयूष गोयल यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून टि्वट केले आहे. 'उद्धव जी, आशा आहे की, आपण निरोगी आहात. तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. आम्ही महाराष्ट्रातून 125 श्रमिक रेल्वे पाठवण्यास तयार आहोत. तुम्ही म्हणाले की, तुमच्याकडे कामगारांची यादी आहे. ही यादी तुम्ही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सुपूर्द करा. म्हणजे, आम्हाला रेल्वेचे वेळेनुसार नियोजन करता येईल. पूर्वीच्याप्रमाणे रेल्वे रिकाम्या जाणार नाहीत,' असे गोयल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
रेल्वेगाडी कुठून सुटणार? रेल्वे गाड्यांनुसार मजुरांची यादी, त्यांची तपासणी केलेले आरोग्य प्रमाणपत्र आणि रेल्वे कुठून कुठे जाणार? या सर्वांची माहिती पुढील एका तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना द्यावी. जेणेकरून आम्ही गाड्या वेळेवर चालवू शकू, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
तसेच पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेने जारी केलेले पत्रक टि्वट केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे मे महिन्यातच नियोजित केलेल्या ६५ रेल्वे रद्द कराव्या लागल्याचे म्हटले आहे. 23 मेपर्यंत रेल्वे मंत्रालयानं 520 रेल्वे महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून दिल्या होत्या. जेणेकरून, जवळपास 7 लाख 32 हजार कामगारांना घरी पोहचवता आलं असते, असे मध्य रेल्वेने पत्रकात म्हटले आहे.