नवी दिल्ली- कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयावरुन निजामुद्दीन मरकझ मधील तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने राजधानी दिल्ली आणि इतर काही ठिकाणी गुरुवारी रात्री छापे टाकले. तबलिघी जमातचे प्रमुख मौलना साद यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून मौलाना साद पसार झाले आहेत.
पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूंत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार मरकझ तबलिघी जमातचे प्रमुख मौलाना साद कांधलवी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौकशी करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.
मौलाना साद यांचा दिल्लीतील बहुतांश ठिकाणी शोध घेण्यात आला मात्र ते पोलिसांना सापडले नाहीत. मौलाना साद दिल्ली पोलिसांच्या गन्हे अन्वेषण विभागाच्या समोर लवकरच हजर होतील, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
दानिश खान आणि आझम या दोघांनी तबलिगी मरकझमध्ये इतर 11 जणांसोबत सहभागी झाल्याचे पोलिसांसमोर मान्य केल्याचे ग्रेटर नोएडाचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार सिंग यांनी सांगितले. दानिश खान आणि आझम यांना संभाव्य कोरोनाबाधित म्हणून ताब्यात घेण्यात आले.
आझम आणि दानिश यांच्यासह सर्व जण राजस्थानातील अलवर येथे गेले होते. त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आझम आणि दानिश तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. इतर काही जण गाझियाबादमध्ये लपून बसले असल्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सागितले. मौलाना साद याच्या सहकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, मौलाना कुठेही लपून बसलेले नाहीत ते पोलिसांसमोर येऊन सर्वकाही स्पष्ट करतील.
जमात आणि पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना चौकशीसाठी हवा असलेल्या संशयिताला तुघलकाबाद शाळा परिसरात त्याच्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सहा-सात आरोपी गुन्हा नोंद झाल्यानंतर पसार झाले आहेत. निजामुद्दीन पोलीस ठाण्यात मुकेश वालिया यांच्या सोबत झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या जमातच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.
पोलिसांना ज्यांची चौकशी करायची आहे ते क्वारंटाईन असल्याने चौकशी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आरोग्य विभागाने परवानगी दिल्यानंतर त्यांची चौकशी करणे शक्य होणार आहे.