नवी दिल्ली - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी 23 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये प्रचारसभांना सुरुवात करणार आहेत. 23 तारखेला त्यांच्या दोन सभा होणार असून त्यातील एक रॅली नितू सिंग यांची उमेदवारी असलेल्या हिसुआ इथे होईल. भूमिहार ही काँग्रेसची व्होटबँक असून गेल्या विधानसभा निवडणुकीत भूमिहार येथे 9 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने याठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे.
दुसरी प्रचारसभा कहलगावमध्ये घेण्यात येणार आहे. जिथे कॉंग्रेसचे दिग्गज नेते सदानंद सिंह यांचा मुलगा मुकेश सिंह याला उमेदवारी मिळाली आहे. सदानंद सिंग हे नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मुलासाठी ही जागा सोडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉंग्रेस आता तेजस्वी यादव यांच्यासोबत संयुक्त रॅली घेण्याचा विचार करत आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राहुल गांधी यांच्या कमीत कमी 6 सभा घेण्याचे नियोजन सध्या करण्यात येते आहे. तर, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी केवळ व्हर्च्युअल रॅलीतून संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी एकूण 12 सभा घेणार असून त्यातील पहिली सभा 23 ऑक्टोबरला होणार आहे. 23 ऑक्टोबरला ते सासराम, गया आणि भागलपूर येथे सभा घेणार आहेत. तर 28 ऑक्टोबरला दरभांगा, मुझफ्फरपूर आणि पटना येथे सभा घेतील. 1 नोव्हेंबरला छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूर येथे सभा घेतील, अशी माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे..