अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी अमेठीमध्ये प्रचारासाठी पोहोचले होते. यावेळी प्रचारसभेत ते संबोधित करत असताना अजान सुरू झाले. राहुल गांधींनी अजानचा आवाज ऐकताच आपले भाषण थांबवले आणि अजान संपल्यानंतर भाषणाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात मोदींवर निशाणा साधताना गेल्या ५ वर्षात काहीच केले नाही, याबद्दल जनतेची माफी मागावी, असे म्हटले.
राहुल म्हणाले, चौकीदारजी यांनी अमेठी आणि रायबरेली येथे होणारे आयआयआयटी आणि फुड पार्क दुसरीकडे वळवले. आम्ही अमेठीला कृषी क्षेत्रात अग्रेसर करायचे होते. परंतु, मोदींनी असे होवू दिले नाही. पंतप्रधान मोदींनी गेल्या ५ वर्षात खूप भाषणे केली. परंतु, जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत. १५ लाख खात्यात जमा करणे असो वा युवकांना रोजगार देणे असो. भारतातील जनतेला हेच जाणून घ्यायचे आहे की, मोदींनी गेल्या ५ वर्षात दिलेली आश्वासने का पूर्ण केली नाहीत. नरेंद्र मोदींनी गेल्या ५ वर्षात काहीच न केल्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याबद्दल राहुल म्हणाले, केंद्र सरकारात फक्त नरेंद्र मोदी गेली ५ वर्ष सरकार चालवत आहेत. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचे काही चालत नाही. त्यामुळे आम्ही मोदींकडूनच उत्तरे मागत आहोत.