नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बुधवारी दिल्लीतील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोंडली येथील प्रचार सभेत भाजप आणि आप पक्षावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांचे राजकारण एकसारखेच आहे. दोघेही लोकांच विभाजन करत असून द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
भारत प्रेमाचा देश असून द्वेषाचा देश नाही. जोपर्यंत देशामध्ये द्वेष आहे. तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. दिल्लीमधील हिंसा संपल्यावरच दिल्लीचा विकास होईल, असे राहुल म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, माझ्या १5 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत तुम्हाला जर एखाद्या भाषणात खोटे बोलणे ऐकायला मिळणार नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्या भाषणात तुम्हाला फक्त खोटे बोलणेच ऐकायला मिळेल. अमित शाह यांच्या भाषणात तर नुसता कचरा असतो. त्याचे भाषणही ऐकू नये. भाजपचे काम फक्त लोकांचे विभाजन करणे आहे.
आम्हाला ही लोक देशभक्ती शिकवत आहेत. या देशातील प्रत्येक जण देशभक्त आहे. त्यांना देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. लोकांचे विभाजन करण्याचे हे मार्ग आहेत. अंबानी आणि अदानी यांचे खिसे मोदी भरत आहेत. देशातील तरुण बेरोजगार आहे. मात्र, त्याकडे सरकारचे लक्ष जात नाही, असेही राहुल म्हणाले. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होईल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.