नवी दिल्ली - 'या देशाची अर्थव्यवस्था देशाची शक्ती होती. आहे नव्हे, होती. आता त्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत ढासळली आहे. भारताची अर्थव्यवस्था एकट्या नरेंद्र मोदींनी संपवली. आडेआठ-नऊ टक्क्यांवर सध्या जीडीपीचा दर साडेपाच टक्क्यांवर आला आहे. तोही आताच्या मापन पद्धतीनुसार. नरेंद्र मोदींनी ही मापन पद्धतच बदलून टाकली. काँग्रेसच्या काळातील मापन पद्धतीनुसार पाहिले तर आताचा जीडीपीचा दर केवळ अडीच टक्के भरेल,' असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते 'भारत बचाओ रॅली'दरम्यान भाषण करत होते.
'भारतीय अर्थव्यवस्थेकडे अत्यंत वेगाने प्रगती करणारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, एका रात्री आठ वाजता नरेंद्र मोदींनी देशातील ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा थेट बंद करून टाकल्या. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. त्यानंतर 'गब्बर सिंग टॅक्स' आणला. या धक्क्यांनी देशाची अर्थव्यवस्था पूर्ण रसातळाला गेली,' अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.
हेही वाचा.... मुंबई - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले
- मागच्या ४५ वर्षांत नव्हती, एवढी बेरोजगारी आज
'मागच्या ४५ वर्षांत नव्हती, एवढी आज बेरोजगारी आहे. मूठभर उद्योगपतींना देशाचा सर्व पैसा दिले. अदानींना एक लाख ४० हजार कोटी दिले. मागच्या काही दिवसात १०-१५ उद्योगपतींचे कर्ज माफ केले. छोट्या उद्योजकांना मात्र, कोणतेच संरक्षण नाही. तुमच्या मोबाईलचे कॉलरेट ५० टक्के वाढवले. नरेंद्र मोदींनी सर्वांच्या खिशातला पैसा काढून घेतला. काँग्रेसला माहीत होते, देशातील शेतकरी, कामगारांशिवाय देश पुढे जाऊच शकत नाही,' असे राहुल म्हणाले.
- तुम्ही मोदींना का निवडले
तुम्ही मोदींना का निवडले .. देशाला मजबूत करण्यासाठी निवडून दिले. मात्र, मोदी ते काम करत नाहीत. देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे त्यांना संसदेत विचारले तर आम्हाला माहीत नाही, असे उत्तर दिले. अशी उत्तरे चक्क देशाच्या संसदेत दिली जात आहेत. एवढे करून मोदी थांबले नाहीत. देशभरात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम मोदी करत आहेत.
हेही वाचा... 'अहंकाराने पराभवाचे आत्मचिंतन होत नाही, काळाची पाऊले न ओळखल्यानं पराभव'
- मोदी दिवसभर टीव्हीवर
मोदी फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात. आपल्या हातात सत्ता आहे की नाही. मोदींना फक्त सत्ता हवी. त्तेसाठी ते काही करू शकतात. मोदी दिवसभर टीव्हीवर दिसतात. ३० सेकंदाच्या जाहिरातीला लाखो रुपये लागतात. एवढा पैसा येतो कुठुन? पंतप्रधान मनमोहन सिंग तर इतका वेळ टीव्हीवर दिसत नव्हते.
हा सर्व पैसा मोदींच्या मित्र उद्योगपतींकडून येत आहे. हेच वास्तव आहे. या उद्योगपतींना मोदींनी तुमच्याच खिशातले पैसे काढून घेऊन श्रीमंत केले. आज अदानीसारख्या उद्योगपतीला एक लाख ४० हजार कोटींचा व्यवसाय देण्यात आला. त्याने विविध क्षेत्रातली सर्व कंत्राटे घेतली. तीही थेट. कोणत्याही प्रक्रियेशिवाय. आज देशभरात हेच सुरू आहे.
हेही वाचा.... पाकच्या माजी संसद सदस्याला भारतीय नागरिकत्वाची आशा; शेंगदाणे, कुल्फी विकून करताहेत निर्वाह
- पत्रकारांनो, तुम्ही तुमचे काम विसरला आहात
राहुल म्हणाले, मी पत्रकारांना सांगू इच्छितो, तुम्ही आज तुमचे काम विसरला आहात. आमचे सरकार असताना तुम्ही आमच्या सरकारवर हल्ले चढवत होतात. ते योग्यच होते. पत्रकार म्हणून तुमचे ते कामच आहे. मात्र, आज मोदी सरकारच्या बाबतीत ते होताना दिसत नाही. पत्रकारांसकट प्रत्येक देशवासियाला मी सर्वांना सांगू इच्छितो, जबाबदारी तुमचीही आहे. जेव्हा तुमच्यावर दबाव निर्माण होते, अन्याय होतो ती केवळ तेवढ्यापुरती किंवा तुमच्यापुरती बाब नसते. हा संपूर्ण देशावर होत असलेला हल्ला आहे. आपण सर्वजण मिळून ही परिस्थिती बदलू शकतो.
आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले. सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरात काँग्रेसतर्फे जिल्हास्तरासह राज्यस्तरावर सुरू असलेल्या आंदोलनांचा समारोप या 'भारत बचाओ रॅली'ने झाला.