नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा काँग्रेसने चांगलाच धसका घेतला आहे. शनिवारी राहुल गांधी यांचे राजीनामा नाट्यही घडले. दरम्यान, देशातील दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या पुत्रप्रेमालाही राहुल यांनी पराभवास जबाबदार धरले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या मुलांची वर्णी लागावी यासाठी काँग्रेसचे अनेक नेते आग्रही होते. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पी. चिदंबरम, म. प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या मुलांना लोकसभेसाठी उभे केले होते. याबद्दल राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला असून यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच कानउघाडणी देखील केली आहे. लवकरच काँग्रेस या मुद्द्यांवर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री जीतू पटवारी यांनी यासंबधी आवाज उठवला होता. राहुल गांधी यांच्या इच्छेविरुध्द कमलनाथ यांनी मुलाला तिकिट दिल्याचे ते म्हणाले. केवळ राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नसून पराभवाची मीमांसा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.