नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरच्या सीमावादावरून राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. लडाखमधील नागरिक चीनने भारताची भूमी बळकावली असल्याचे म्हणत असताना पंतप्रधान मोदी मात्र, कोणीतरी खोटे बोलत असल्याचे म्हणत आहेत. राहुल गांधींनी सीमा वादावरुन याआधीही पंतप्रधान मोदींना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
यासंबधी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. लडाखमधील नागरिक आणि पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामध्ये तफावत आहे. लडाखचे नागरिक म्हणत आहेत. चीनने भारताची भूमी बळकावली. मात्र, मोदी म्हणत आहे, की कोणीही भारताची भूमी घेतली नाही, अर्थातच कोणतरी खोटे बोलतयं. यावरून राहुल गांधी यांनी टीका केली.
चीनने भारताचा भूभाग घेतल्याचा आरोप लडाखी नागरिक करत असल्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी शेअर केला आहे. सरकार लडाख प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. भारतीय भूमी चीनला देवून मोदींनी त्यांच्यापुढे गुडगे टेकले आहेत. तसेच सीमा वादावर खोटे बोलल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
मोदींची लडाखला भेट अन् राहुल गांधींची टीका
पंतप्रधान मोदींनी आज लडाखला अचानक भेट देऊन लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती दिली. भारताची सीमेवरील (फॉर्वर्ड पोस्ट) निमू चौकीला मोदींनी भेट दिली. यावेळी मोदींबरोबर सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे होते.