नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये धुमाकूळ घातला आहे. भारतात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यावर निशाणा साधला आहे. 'केंद्रीय आरोग्य मंत्री हे समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या कप्तानासारखे बोलत आहेत, असे राहुल गांधी यांनी टि्वट केले आहे.
देशामध्ये कोरोना विषाणू नियत्रंणामध्ये आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणत आहेत. हे अगदी तसेच आहे. जसे टायटॅनिक जहाजाच्या कप्तानाने सांगितले होते, प्रवाशांना घाबरण्याची गरज नाही, कारण, आमचे जहाज कधीच बुडणार नाही, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
चीनमध्ये भयानक रूप धारण केलेल्या कोरोना विषाणूने भारतातही आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढून 30 झाली आहे. यामध्ये इटलीच्या १६ नागरिकांचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून आरोग्य मंत्रालयाच्या वतीने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत.
टायटॅनिक जहाज ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून १० एप्रिल १९१२ मध्ये न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, १५ एप्रिल १९१२ रोजी हे महाकाय जहाज हिमनगावर आदळून उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले. अवघ्या २ तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन या जहाजाने जलसमाधी घेतली होती. जगातले सगळ्यात मोठं आणि कधीही न बुडणारे आलिशान जहाज अशी या जहाजाची ख्याती होती.