नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संरक्षणसंबधी स्थायी समितीच्या बैठकीला शुक्रवारी हजेरी लावली. यावेळी राहुल गांधींनी लष्करातील जवानांना मिळणाऱ्या जेवणाबद्दल प्रश्न उपस्थित केले. तसेच यासंदर्भातील एक अहवालही त्यांनी बैठकीत सादर केला. दरम्यान, या बैठकीला त्यांनी पहिल्यांदाच हजेरी लावली असून यापूर्वी सभेला उपस्थित न राहिल्यावरून त्यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आलेली आहे.
अधिकारी आणि जवानांना वेगवेगळे जेवण दिले जाते. जवानांसोबत असा भेदभाव का केला जातो, असा सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला. यापूर्वी जवान तेजबहादूर याने जेवणासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
या बैठकीत अनेक नेत्यांनी लडाखच्या परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीपूर्वी ते सिमेवरील परिस्थितीबाबत माहिती मागवतील, असे पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. त्यांची विनंती नमूद केली गेली असून त्यावर विचार करण्यात येईल, असे उत्तर आज पॅनेलने दिले आहे.