नवी दिल्ली - मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे जनतेला दिलेला धोका आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 'डिअर नोमो, तुमच्या अक्षमता, अपात्रता आणि उद्धटपणाच्या ५ वर्षांच्या सत्तेमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त केले आहे. शेतकऱयांना १७ रुपये प्रति दिवस देऊन तुम्ही त्यांचा अपमान केला आहे', असे ट्विट करत राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
हा अर्थसंकल्प नसून निवडणुकींचा जाहीरनामा आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिष रावत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्प संसदेत सादर होण्यापूर्वी मीडियाकडे गेला होता, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे. जर याप्रकारे संसदेपूर्वी अर्थसंकल्पाची प्रत माध्यमांकडे गेली असेल तर याविषयी चौकशी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
'या बेजबाबदार सरकारला पुढील पाच वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही,' असा हल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चढवला आहे. 'हे पुन्हा सत्तेत येणारच नाहीत. ५ वर्षांपूर्वी सत्तेत आले तेव्हापासून यांनी जनतेसाठी काहीही केले नाही. एकीकडे जनतेचे हाल पाहावत नाहीत आणि आता सरकारची 'एक्सपायरी' जवळ आल्यानंतर सरकार औषध देत आहे. 'एक्सपायरी'नंतर औषध देऊन काय होणार आहे? हे सर्व पूर्णतः निरुपयोगी आहे,' असे त्या म्हणाल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी हा अर्थसंकल्प अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केला आहे की, आरएसएसने; असा सवाल केला आहे. 'या अर्थसंकल्पात नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना कॉटन कँडी (बुढ्ढी के बाल) दिली आहे. हा अर्थसंकल्प दिसायला भरीव आहे. मात्र, पोकळ आहे. मी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली होती, तेव्हा मोदींनी त्याला 'लॉलीपॉप' म्हटले होते. भाजपमित्रांनी २०१९चा अर्थसंकल्प तयार केला आहे,' असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी हा अर्थसंकल्प फुसका बार असल्याचे म्हटले आहे. 'यामध्ये एकच चांगली गोष्ट दिसते. मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत मिळाली आहे. शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा हातभार लावण्यात आला आहे. म्हणजे दर महिन्याला ५०० रुपये. यामुळे शेतकऱ्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे का,' असा सवाल त्यांनी केला.