नवी दिल्ली - 'डॉक्टर डे'च्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनामुळे दगावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी हा विषय सरकारकडे मांडण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. अनेक कोरोना वॉरिअर्सनी राहुल गांधींसमोर समस्या मांडल्या.
दक्षिण दिल्लीतील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा (नर्स) कोरोनामुळे मृत्यू झाला. सरकारने 1 कोटी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, असे विपिन कृष्णण या आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले. विपिन दिल्लीतील एम्स रुग्णालयात कार्यरत आहे. याआधी त्याला आणि त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. सरकारने दगावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे, असे विपिन म्हणाला.
एम्स रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना राहुल गांधी म्हणाले, मी या प्रकरणी सरकारला पत्र लिहून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया जलद करण्याचा प्रयत्न करेल. कोरोनाचा सामना करताना आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. मात्र, आम्ही तरीही प्रयत्न करत आहोत. सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयात खुप मोठा फरक आहे, असे आरोग्य कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
खासगी रुग्णालायतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केली जाते, हा मुद्दाही राहुल गांधींच्या लक्षात आणून दिला. दिल्लीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधा आणि एकूणच कोरोना चाचणीच्या स्थितीवर चर्चा केली. दिल्लीमध्ये कोरोनाचे साडेपाच लाख रुग्ण होतील, असा अंदाज खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत फक्त 10 हजार खाटा उपलब्ध आहेत. यावरून आपण कल्पना करु शकतो. परिस्थिती किती गंभीर आहे, असे आरोग्य कर्मचारी म्हणाले.