नवी दिल्ली- भारत छोडो अभियान महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 ला जाहीर केले होते. या काळात जगामध्ये दुसरे महायुद्ध सुरू होते. या अभियानाद्वारे ब्रिटिश सरकारने भारतातील राज्य सोडून द्यावे,अशी मागणी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हा महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो. हे आंदोलन फार काळ सुरू राहिले नाही. मात्र, इंग्रजांना आपण भारतावर जास्त काळ राज्य करु शकत नाही, याची जाणीव झाली. हे या आंदोलनाचे यश मानले जाते.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात इंग्रजांच्या साम्राज्यवादाविरोधात देशातील जनता उभी राहिली. याच दिवशी महात्मा गांधी यांनी करू किंवा मरू अशी घोषणा दिली. यानंतर संपूर्ण देशातील लोक इंग्रजांविरुद्ध उभे राहिले. मुंबईच्या गवालिया टँक म्हणजेच आताचे आझाद मैदान येथून चळवळ सुरू झाली.
4 जुलै 1942 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. त्यामध्ये इंग्रजांना भारताबाहेर काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सी. राजगोपालचारी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांनी गांधीजींचे ध्येय पूर्ण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 8 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबई येथे भारत जोडो अभियानाचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, भारत छोडो अभियान यशस्वी झाले नाही. कारण ब्रिटिशांनी दुसऱ्याच दिवशी आंदोलन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांचा समावेश होता. यातील बरेच नेते 1945 पर्यंत तुरुंगात होते. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर हे आंदोलन हिंसक बनले.
भारत छोडो अभियान किंवा चलेजाव चळवळ सुरू असताना स्वातंत्र्यसैनिकांकडे स्पष्ट असा आराखडा नव्हता. 1943 ला हे अभियान संपले. मात्र, भारत छोडो अभियानाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे स्थान आहे. या आंदोलनामुळे इंग्रज सरकारला भारतामध्ये दीर्घकाळ शासन करता येणार नाही याची जाणीव झाली.
भारत छोडो अभियानात अनेक महिला नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये उषा मेहता, सुचेता कृपलानी, सुशीला नायर, राजकुमारी अमृत कौर यांचा प्रमुख समावेश होता.
उषा मेहता यांनी रेडिओ केंद्र सुरू केले होते. त्याचे नाव व्हॉइस ऑफ फ्रीडम ठेवण्यात आले होते. त्यांच्या भावासोबत रेडिओ केंद्र चालवत होत्या. 12 नोव्हेंबर 1942 या कालावधीपर्यंत त्यांचे रेडिओ केंद्र सुरू होते. इंग्रजांनी पडल्यानंतर त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. भारत छोडो अभियानातील विविध गटातील लोकांसोबत संपर्क साधण्याचे काम सुचेता कृपलानी या करत होत्या. देशभरात अहिंसक पद्धतीने आंदोलन सुरू राहावे, असा त्यांचा प्रयत्न होता. 1944 ला त्यांना अटक करण्यात आली आणि लखनऊ जेलमध्ये ठेवण्यात आले.
गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांच्या भगिनी सुशीला नायर या कस्तुरबा गांधी यांची वैद्यकीय तपासणी करत होत्या. त्यांना महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई यांच्यासोबत पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये तुरुंगात ठेवण्यात आले होते.
राजकुमारी अमृत कौर या कापूरथाळा राजघराण्याशी संबंधित होत्या. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याने त्या प्रभावित झाल्या होत्या. दांडी येथील मीठ सत्याग्रह आणि भारत छोडो अभियानात सहभागी होत्या. अमृत कौर यांचे कार्य महिलांना शिक्षण देणे आणि हरिजनांच्या विकासासाठी प्रयत्न करणे असे राहिले. त्या ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्ष राहिल्या होत्या.1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्या सक्रिय सहभागी होत्या.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारत छोडो अभियानाच्या लढ्याचे स्मरण केले. लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग केला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.