नवी दिल्ली - दसरा आणि सणासुदीत दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी प्रदुषणाविरोधात लढण्यासाठी नागरिकांना नाकाला मोहरीचे तेल लावण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीची हवा आणखी खराब असेल, अशीही शर्मा यांनी माहिती दिली.
भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा म्हणाले, की खराब हवा ही निश्चितच हानीकारक आहे. सुदैवाने लोक कोरोनाच्या काळात मास्क वापरतात. हे मास्क विषाणूला रोखू शकतात. तसेच प्रदूषणातील घटकांविरोधात लढण्यासाठी मदत करतात. याचबरोबर लोक दैनंदिन जीवनात असलेल्या पद्धतींचा वापर करू शकतात. उदा. लोक नाकाला मोहरीचे तेल लावू शकतात. त्यामुळे काही प्रदुषण करणारे घटक तिथे अडकू शकतात, असा दावा आनंद शर्मा यांनी दिला.
दरम्यान, साधे मास्क हे कोरोनापासून बचाव करू शकत नाही, हे यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय हवा खराब झाल्याची टीका केली होती.