अमृतसर – पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने 86 जणांचा मृत्यू झाल्यानंतर लुधियाना पोलिसांनी अवैध दारूचे रॅकेट उद्धवस्त केल्याची माहिती दिली. लुधियाना पोलिसांनी 18 मे ते 1 ऑगस्टदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केल्याचे स्पष्ट केले आहे.
लुधियाना पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा 2 लाख लिटरचा कच्चा माल दोन महिन्यात जप्त केला आहे, तर 1 हजार 612 लिटरची अवैध दारू जप्त केली आहे. त्याचबरोबर 4,606 लिटरची विविध ब्रँडची वाईन जप्त केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. विषारी दारू प्यायल्याने नागरिकांचे मृत्यू झाल्यानंतर पंजाब पोलिसांवर चहूबाजूने टीका होत आहे. अशा स्थितीत लुधियाना पोलीस आयुक्त कार्यालयाने दोन महिन्यात अवैध दारू कारवाईप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती जाहीर केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना अवैध दारूप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. त्यामध्ये विविध जिल्ह्यातील दारू तस्करीसह इतर प्रकरणाच्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आल्याचे लुधियाना पोलिसांनी म्हटले आहे.
अशी केली आहे पोलिसांनी कारवाई-
ही कारवाई तस्करीविरोधी सेलने केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मेच्या मध्यावधीपासून ऑगस्टपर्यंत एकूण 270 आरोपपत्र दाखल केले आहेत, तर तस्करीविरोधी सेलने 50 हजार लिटरचा दारूचा कच्चा माल हा नष्ट केला आहे. हा कच्चा माल पोलिसांनी सतलज नदीजवळ असलेल्या ड्रम व प्लास्टिकच्या कॅनमधून जप्त केला होता.
लाढोवाल जिल्ह्यात पोलिसांनी रविवारी 12 जणांविरोधात अवैध दारूच्या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. लुधियानाचे पोलीस आयुक्त राकेश अग्रवाल यांनी अवैध दारू विक्री, तस्करीप्रकरणात कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा गुन्हेप्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याचीही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.
काय आहे विषारी दारूचे प्रकरण?
पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरणतारण या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अकाली दलने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 104 झाली आहे. तरणतारण जिल्ह्यात रविवारी पुन्हा 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या तरणतारण जिल्ह्यात 75 जणांचा मृत्यू झाला आहे.