अमृतसर : कृषी कायद्यांविरोधात सुरू असणारे आपले रेल रोको आंदोलन आठ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय किसान मजदूर संघर्ष समितीने घेतला आहे. आज (५ ऑक्टोबर) हे आंदोलन संपणार होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे संसदेमध्ये मांडण्यापूर्वीच त्यामधील तरतुदींबाबत चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे न करता थेट हे कायदे मंजूर करुन घेतले. त्यामुळे आम्ही या कायद्यांविरोधात रेल रोको आणि कँडल लाईट मार्च करत आहोत, असे किसान मजदूर संघर्ष समितीचे सचिव सुखबिंदर सिंह यांनी म्हटले आहे. आज हे आंदोलन संपणार होते, मात्र सरकार कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करु, असे म्हणत समितीने हा रेल रोको आठ तारखेपर्यंत वाढवला आहे.
२४ सप्टेंबरला राज्यात ठिकठिकाणी हे रेल रोको सुरू झाले होते. तेव्हा २६ तारखेला ते संपणार होते. मात्र, त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत आंदोलन वाढवण्यात आले. त्यानंतर, पुन्हा पाच ऑक्टोबरपर्यंत वाढवल्यानंतर आता परत हे आंदोलन आठ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आले आहे.
हेही वाचा : कृषी कायद्याविरोधात पंजाबात शेतकरी आक्रमक, दिल्ली अमृतसर महामार्ग रोखला