चंदीगढ (पंजाब) - धान पेरणीसाठी कामगारांना कमतरता भासू नये, अशी अपेक्षा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी व्यक्त केली. राज्यात अजूनही 10 लाख प्रवासी मजूर आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात जवळपास तेरा लाख मजूर होते. त्यापैकी तीन लाख मजूर त्यांच्या गावी, त्यांच्या राज्यात परतले आहेत, तर अजूनही जवळपास 10 लाख मजूर राज्यात असल्याची माहिती कॅप्टन सिंग यांनी दिली. सिंग यांनी #AskCaptain या नावाचा फेसबुक लाइव्ह कार्यक्रम केला.
जर मजुरांना काम मिळाले तर, ते परत न जाता राज्यातच थांबतील. त्यामुळे कामगारांची कमतरता भासणार नाही, असे सिंह यांनी धान पेरणीसाठी कामगार टंचाईवरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कोरोनाच्या साथीमुळे परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात परतत असल्याने धान लागवडीसाठी कामगारटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. अशा कठीण आणि संकटाच्या काळातही शेतकरी शेत पिकवण्यासाठी मेहनत घेत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
सिंग यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून 125 लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आला असून निर्धारित नियमांनुसार शेतकऱ्यांनी देयके देण्यात येत आहेत. जर, पैसे देण्यात विलंब होत असेल, तर शेतकऱ्यांनी त्याबद्दल शासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सिंग यांनी केले.
शेतीमालाची खरेदी करताना मंडईत कोरोनासाठी प्रतिबंधित उपाय करून प्रसार होऊन न दिल्याबद्दल सिंग यांनी कृषी विभागाचे अधिकारी, पोलीस तसेच एनसीसी कॅडेट्सचे कौतुक केले.