(बंगळुरू) कर्नाटक: मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कन्नड समर्थक संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे. आज राजधानी बंगळुरूसह राज्यभरात बंद पाळण्यात येत आहे.
कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातदेखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली असून वाहतूक सेवाही काही प्रमाणात बंद आहे. शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात -
बंगळुरूच्या टाऊन हॉलमध्ये मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या विरोधात आंदोलन करणार्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमध्ये आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असून कन्नड समर्थक कार्यकर्ते विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत.
कन्नड समर्थकांचा मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या घरावर मोर्चा -
मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या विरोधात कर्नाटक बंदचा एक भाग म्हणून कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी मेखरी सर्कल ते बंगळुरू येथील मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा काढला.
कलबुर्गीत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात-
मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेविरोधात कर्नाटक बंदचा एक भाग म्हणून कलाबुरागीतील सरदार वल्लभभाई पटेल चौकात निदर्शने करत असलेल्या कन्नड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
५० कोटींची तरतूद केल्याची येडीयुरप्पा यांची घोषणा-
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी १५ नोव्हेंबरला यासंबंधीचे आदेश दिले होते. तसेच मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. कर्नाटक राज्यात सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.