मिर्जापूर - सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे. मात्र, पीडितांची भेट घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडितांचे दोन नातेवाईक मला भेटायला आले होते. आणखी १५ जणही मला भेटायला आले आहेत, मात्र, पोलीस आमची भेट होवू देत नाही. प्रशासनाची मानसिकता काय आहे? मला समजत नाही, असे गांधी म्हणाल्या. तसेच माध्यमांनी प्रशासनावर दबाव वाढवण्याचे आवाहन गांधीनी केले.
काल (शुक्रवारी) गांधींना ताब्यात घेतल्यापासून त्या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. सोनभद्र जिल्ह्यात हत्यांकाड झाले तेथे संचारबंदी असून कलम १४४ लागू असल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्या कार्यकर्त्यांसह वाराणसीवरुन सोनभद्रला जात होत्या. मात्र, रस्त्यात पोलिसांनी अडवल्यापासून त्या पीडितांना भेटण्याच्या मागणीवर ठाम आहेत. नारायणपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून त्या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह चुनार गेस्ट हाऊस येथे हलवले आहे. मात्र, त्या तेथेही धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.
पोलीस मला पीडितांना न भेटताच माघारी जाण्यास सांगत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मला कोणत्या कारणावरुन अटक केले याबाबतची माहितीही दिली नाही, असे त्यांनी ट्विट केले आहे. मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. संचारबंदी असली तरी पीडितांना भेटण्यासाठी २ व्यक्ती जाऊ शकतात. मात्र, मला तेथे जाऊ न देता पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली. मागील ७ तासांपासून मला ताब्यात घेतले आहे, असे गांधी म्हणाल्या.
पीडितांना भेटण्यापासून सरकार मला अडवत असेल, तरुंगात टाकत असेल, तर मीही त्यासाठी तयार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच मी जामिनाच्या रक्कमेपोटी एक पैसाही भरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१७ जुलै रोजी सोनभद्र जिल्ह्यातील उभ्भा गावामध्ये जमिनीवरुन दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता, तर १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. या हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.