नवी दिल्ली - प्रियंका गांधी यांना चुनार अतिथीगृहामध्ये मुलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.
शुक्रवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे गेल्या होत्या. १७ तारखेला झालेल्या सोनभद्र येथील गोळीबाराच्या घटनेत मृत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले व परिसरात कलम १४४ लागल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांना प्रियांका गांधी यांना मिर्झापूर येथे हलविले. यानंतर मिर्झापूर येथील चुनार अतिथीगृहामध्ये त्यांना पाठविण्यात आले. मात्र, येथे त्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरुन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तरप्रदेशमध्ये जंगलराज असल्याची टीका केली आहे.
भाजप सोनभद्र येथील गोळीबाराप्रकरणी दोषी असणाऱ्यांना पकडत नाही. मात्र, घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यास गेलेल्यांना पोलीस कोठडीत टाकते, असे सुरजेवाला म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र जंगलराज असून शासन येथील गुन्हेगारीला आळा घालण्यास अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी योगी आदित्यानाथ यांना सर्वस्वी जवाबदार ठरविले. सोबतच प्रियांका गांधी मृतांच्या नातेवाईकांना भेटायला गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी कुठल्याही नियमांचे उल्लघन केले नाही. मात्र, तरी देखील त्यांना अटक केले असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केला आहे.
दरम्यान, प्रियांका गांधींनी सोनभद्र गोळीबार घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना भेटायला जाणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आपली तुंरुगातही जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.