बिश्केक - पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकारी संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेला किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे उपस्थित आहेत. बिश्केक येथे मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मोदी प्रथमच बहुपक्षीय परिषदेला हजर राहिले आहेत.
मोदी यांची प्रथम चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक झाली. चीन व्यतिरिक्त मोदींनी इतर राष्ट्रांच्या प्रमुखांसोबतही इतर मुद्यांवर चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले, परिषदेमध्ये जागतिक सुरक्षा, बहुपक्षीय आर्थिक सहयोग, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यावेळी इतर देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याची योजना आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबत ट्वीट केले आहे, की नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान मजबूत करत आहेत. बिश्केक येथे १३ ते १४ जून या कालावधीत मोदी अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांना भेटतील. मोदींची चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक होणार आहे. परंतु, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत बैठक होणार नाही.