विदिशा (मध्यप्रदेश) - दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्याकरिता बच्चू कडू हे दिल्लीकडे रवाना झाले आहे. दरम्यान, ते मध्यप्रदेशमधील विदिशा येथे पोहोचले असता, पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांना मुर्ख बनवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू -
देशात नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्तावर उतरले आहे. गेल्या ८ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. परंतु केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. त्यामुळे ८ डिसेंबररोजी शेतकऱ्यांनी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. याला अनेक शेतकरी संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. दरम्यान, दिल्लीच्या दिशेने निघालेल्या बच्चू कडू यांनी मध्यप्रदेशमधील विदिशा येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी पंतप्रधान मोदींवर जाेरदार टीका करत, मोदी हे देशातील शेतकऱ्यांना मुर्ख बनवत असल्याचा आरोप केला. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही ते म्हणाले.