जयपूर - हिरवी कोथिंबीर हा भारतीयांच्या आहारामधील महत्त्वाचा घटक आहे. मात्र राजस्थानमधील भारतपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आहारामधून कोथिंबीर गायब झाली आहे. कारण कोथिंबिरीचा भाव प्रति किलो ४०० रुपये म्हणजे १०० ग्रॅमसाठी ४० रुपये एवढा आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने हिरव्या कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाला विक्रेत्यांना बाहेरून भाजीपाला जादा दराने खरेदी करावा लागत आहेत.
रामप्रकाश या पालेभाज्या विक्रेत्याने सांगितले, की संपूर्ण कोथिंबिरीचा माल हा बाहेरून आणावा लागत आहे. कोथिंबिरीचा बाहेरून आलेला मालही खराब होता. वाहतुकीचा खर्चही खूप वाढल्याने कोथिंबिरीचे दर वाढले आहेत.
सामान्यस्थितीत पालेभाज्या खरेदी केल्यानंतर ग्राहकांना कोथिंबीर मोफत दिली जाते. मात्र कोथिंबिरचा भाव हा प्रति किलो ४०० रुपये झाल्याने कोणताही भाजीपाला विक्रेता मोफत कोथिंबीर देत नसल्याचे भाजीमंडईमधील चित्र आहे. कोथिंबिरच्या किमती गगनाला भिडल्याने ग्राहकांनी कोथिंबिर खरेदी करणे थांबविले आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांचेही नुकसान होत आहे.