हैदराबाद - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. लवासा हे 31 ऑगस्टला निवडणूक आयोगाच्या सेवेतून कार्यमुक्त होतील.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची फिलीपाईनमधील आशियाई विकास बँकेत उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठांनुसार लवासा यांना पुढील वर्षी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळण्याची संधी होती. आता लवासा यांचा राजीनामा आणि अरोरा यांच्या निवृत्तीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त पदाची धुरा सुशील चंद्रा यांच्याकडे जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्यापूर्वी १९७३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नागेंद्र सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
लवासा हे गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीवेळी चर्चेत आले होते. जेव्हा त्यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी क्लीनचिट दिली होती. 1980 च्या बॅचचे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या लवासा यांची जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.