नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी ढासळली असून, आज ते व्हेंटिलेटरवर राहणार असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. त्यांच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने आर्मीच्या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये कोणताही सुधार दिसला नाही, उलट त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
मुखर्जींना सोमवारीच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ट्विटरवरून त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये गाठ आढळल्याने मुखर्जी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत ही गाठ काढण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचे एक पथक सातत्याने प्रणव यांचे निरीक्षण करत आहे.