भोपाळ - भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धमकी दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची नोंदवही जमा करण्यास मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना सात दिवसांची मुदत दिली आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर यांना धमकी देणारे पत्र लिहल्याच्या आरोपाखाली मध्यप्रदेश पोलिसांनी डॉ. सईद अब्दुल रेहमानला महाराष्ट्रातून अटक केली होती.
रेहमान अटक प्रकरणातील नोंदवही जमा करण्यास पोलिसांनी आणखी वेळ मागितला होता. त्यानुसार न्यायमूर्ती सुजोय पॉल यांनी पोलिसांना सात दिवसांची मुदत दिली आहे, असे डॉ. सईद अब्दुल रेहमान यांच्या वकिलाने सांगितले.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर रेहमान याने प्रज्ञा ठाकूर यांना धमकी देणार पत्र लिहल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ठाकूर यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करत मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
महाराष्ट्र कनेक्शन
डॉ. सईद अब्दुल रेहमान हा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. 17 जानेवारीला भोपाळ दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) रेहमानला नांदेड येथून अटक केली होती. एटीएसने रेहमान आणि इतर काही व्यक्तींवर प्रज्ञा ठाकूर यांना धमकी देणारे पत्र लिहल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या पत्रांच्या पाकिटात रासायनिक पावडरही ठेवण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर आहे. भोपाळमधील कनिष्ठ न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नाकारल्यामनंतर रेहमान याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.