व्हॅटिकन सिटी - ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस काही नेत्यांच्या पाया पडल्यामुळे जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. ज्या नेत्यांच्या पोप फ्रान्सिस पाया पडले ते नेते एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते. मात्र, एकमेकांचा विरोध विसरून एकत्र येत विश्वशांततेसाठी आयोजित केलेल्या धर्मसभेत पोपने त्यांचे पाय धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मी तुम्हाला शांतता राखण्याचे आवाहन करतो. मी हे तुम्हाला माझ्या हृदयातून सांगत आहे. चला आपण एकत्र विश्वशांतीसाठी समोर येऊ, असे ८२ वर्षीय पोप यांनी त्या नेत्यांचे पाय पकडल्यानंतर म्हटले.
सुदान हा मुस्लीमबहुल देश आहे तर, दक्षिण सुदान हा ख्रिस्ती देश आहे. २०११मध्ये स्वतंत्र झालेल्या या दोन्ही देशांमध्ये धर्माच्या वादावरुन अनेकदा मोठे युद्ध झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ४ लाख लोकांना या देशाने गमावले होते. त्यानंतर २०१३मध्ये दोन्ही देशांनी शांततेचा करार केला. एकेकाळी एकमेकांचे शत्रु असणारे दक्षिण सुदानच्या नेत्यांनी गुरुवारी एकत्र येऊन वॅटिकन येथे ही धर्मसभा आयोजित केली होती.
त्यावेळी तेथे पोप फ्रान्सिसही उपस्थित होते. दरम्यान सुदानचे साल्व्हा किर आणि त्यांचे विरोधक रेईक मायकेल यांच्याशी भेट घेताना पोप यांनी चक्क त्यांचे पाय पकडले. तसेच त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.