नवी दिल्ली - लोकसभेत आज तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी भाजप खासदार आणि विरोधकांमध्ये यावरुन चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विरोधात आपले मत मांडले. भाजपकडून ओवैसींना प्रत्युत्तर देताना पुनम महाजन यांनी लोकसभेत जोरदार बॅटिंग केली आहे.
ओवैसी म्हणाले, की तिहेरी तलाक विधेयक हे मुसलमानांना त्यांच्या धर्मापासून वेगळे करण्यासाठी मांडण्यात आले आहे. भारतात आम्ही कुराणच्या विचारधारेनुसार राहणार आहोत. याआधीही महिला अत्याचार कमी होण्यासाठी अनेक कायदे बनविण्यात आले. परंतु, या कायद्यांमुळे महिलांच्या अत्याचारांचे प्रमाण घटणार नाही. राजीव गांधी यांनी बनवलेला कायदाही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. तिहेरी तलाक कायदा मुस्लीम महिलांचा छळ करेल. यासाठी मी या कायद्याला विरोध करत आहे.
विवाह पद्धतीवर बोलायचे झाल्यास तुम्ही त्याला उद्योग म्हणता की दुसरे काही म्हणता मला माहित नाही. परंतु, आमच्या इथे विवाहाला पवित्र संस्कार मानले जाते. सप्तपदीवर आम्ही जेंव्हा शपथ घेताना आम्ही प्रत्येक गोष्टीवर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतो. धर्माचा अर्थ प्रत्येकजण त्याच्याप्रमाणे सांगतो. परंतु, आपण ज्या समाजात राहतो त्याप्रमाणे धर्म पुढे जायला पाहिजे. या काळात समाज बदलत आहे. भारत आणि जग पुढे जात आहे त्याप्रमाणे आपल्याही धर्मात बदल करायला पाहिजेत. ज्या हिंदू धर्मातून मी आली आहे. त्या हिंदू धर्मातही सती प्रथा, बालविवाह आणि इतर अनेक परंपरावर बंदी घालण्यात आली. यासाठी समाजसुधारकांनी पुढाकार घेतला. १९५६ साली महिलांना समाजसुधारकांमुळे ताकद मिळाली. पतीने सोडून दिले तर पत्नी तिच्या अधिकारासाठी पतीविरोधात लढू शकते. ही ताकद आम्हाला कायद्याने दिली आहे. कायद्यानुसार प्रत्येकाला समानता आहे. कायद्यानुसार, आपण वाईट गोष्टी सहन करू शकत नाही. सध्या २१ वे शतक चालू आहे. मंगळयान मिशन चालू आहे. आज इस्रोत सर्वात जास्त शास्त्रज्ञ महिला आहेत. अशी परिस्थिती असतानाही महिलांना तिहेरी तलाक दिलेला तुम्हाला चालेल का? आणि तुम्ही याला मुबारक म्हणणार का?, असा प्रश्न पुनम महाजन यांनी उपस्थित केला.
पुनम महाजन ओवैसींना प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, की मी एका मुलीची आई आहे. एका चांगल्या आणि खुशीत राहणाऱ्या परिवारात उद्या जर तुमच्या मुलीला कोणी व्हॉटसअॅपवरती तलाक, तलाक, तलाक म्हटले तर तुम्हाला आम्ही मुबारक म्हणायचे की दु:ख व्यक्त करायचे. महिला सशक्तीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, मी स्वत: मराठी माध्यमातून आले आहे. इंग्रजीचे शिक्षण आम्हाला दहावी ते बारावीनंतर मिळते. he आणि she चे अर्थ समजून घेत आम्ही पुढील शिक्षण घेत होतो. मी माझ्या वडीलांना विचारले, he आणि she मध्ये फरक का केला जातो. माझ्या वडीलांना मला उत्तर दिले, s म्हणजे सुपेरिअर आणि ते he च्या पुढे लावले जाते, त्यामुळे मुलीला she म्हटले जाते. अशाप्रकारची शिकवण माझ्या वडिलांनी दिली आहे. आम्ही याच विचारधारेला पुढे घेऊन जात आहोत. महिला सशक्तीकरण करण्यासाठीच तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करते.