लखनौ - उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागातील पाच अधिकाऱ्यांना मेरठमधील स्थानिकांनी डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी पोलिओ लसीकरण पथकातील पाच अधिकारी माहिती गोळा करत असताना, ते एनपीआर आणि एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी माहिती गोळा करत आहेत, असा संशय आल्याने काही नागरिकांनी त्यांना ताब्यात घेत डांबून ठेवले होते.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय साही यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लिसारी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामध्ये कबीर अहमद खान, एक महिला कर्मचारी आणि आणखी काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी स्थानिकांनी त्यांच्याशी गैरवर्तणुक केल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित कलमांतर्गत आम्ही लिसारी गेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असे साही यांनी स्पष्ट केले.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार यांनी सांगितले, की आमचे पोलिओ लसीकरण करणारे पथक लाकीपूरा भागामध्ये पोहोचले होते. यावेळी काही स्थानिक नागरिक जमाव करुन थांबले होते. आमच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तिथल्या लोकांना घरी असलेल्या लहान मुलांबाबत माहिती विचारून त्याची नोंद करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिथल्या लोकांनी अधिकाऱ्यांसोबत गैरव्यवहार करत त्यांना ताब्यात घेऊन डांबून ठेवले. त्या लोकांना असा संशय होता, की आमचे अधिकारी एनपीआर आणि एनआरसीसाठी माहिती गोळा करत आहेत. काही वेळानंतर मात्र या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा : काँग्रेसने मोदींना पाठवले संविधान; पेमेंट ऑप्शन 'कॅश ऑन डिलीव्हरी'