कोलकाता - शहरातील दोन भागांमध्ये जमावाने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 पोलीस कर्मचाराऱ्यांसह 7 नागरिकही जखमी झाले असून पोलीस विभागाच्या वाहनांचे नुकसान झाले. ही घटना हुगळी आणि दक्षिण 24 परगना येथे घडली आहे. या दोन विभागातून तब्बल 72 जणांना अटक केली आहे.
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आश्रय दिलेल्या गुंडांचा या हल्ल्यामागे हात असल्याचा दावा विरोधी पक्ष भाजपने केला आहे. तसेच विरोधी पक्ष भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल जगदीप धनखार यांना याबाबत सांगितले. राज्यपालांनी "घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊनमध्ये राज्यात जातीय संघर्ष घडवून आणल्याच्या आरोपाखाली विरोधी पक्षावर जोरदार टीका केली.
हुगळी जिल्ह्यातील तेलिनीपारा येथे लॉकडाऊनमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारी दरम्यान 4 पोलीस कर्मचारी आणि 7 स्थानिक लोक जखमी झाले असून अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती चंदननगर पोलिस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी रात्री जूट गिरणीजवळ दोन गटातील सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी त्यांनी एकमेकांवर हल्ले करत दुकाने पेटवून दिली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. आतापर्यंत 54 लोकांना अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर भागात चहाच्या स्टॉलजवळ जमलेल्या लोकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये 4 जण जखमी झाले. पोलिस कर्मचार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी अठरा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.