दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या साकेत परिसरात लॉकडाऊनमुळे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. पोलिसांनी आपल्या नवजात बाळाला घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या कामगार दाम्पत्याला जेवायला देऊन मालवीय नगरपासून 12 किलोमीटर असलेल्या त्यांच्या डेरा गावी पोहचवले.
महिलेचे नाव रिंकी असून तिच्या पतीचे नाव मुकेश आहे. रिंकीची बुधवारी सकाळी दक्षिण दिल्लीच्या मदन मोहन मालवीय नगर रुग्णालयात प्रसुती झाली. दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे तिला घरी जाण्यासाठी वाहन मिळत नव्हते. त्यामुळे हे दाम्पत्य पायी आपल्या गावी निघाले. दरम्यान, महिला चालू शकत नसल्याने तिथेच रस्त्याच्या कडेला हे दाम्पत्य बसून राहिले. याचवेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या टीमने त्यांना बघितले. चौकशीनंतर पोलिसांनी या दाम्पत्याच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या गावी सोडले.
दिल्ली पोलिसांच्या मदतीने एका मजूर दाम्पत्याला त्यांच्या नवजात बाळासह सुरक्षित घरी पोहोचवले. दिल्लीत लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी लोकांना मदत केलेल्यांच्या घटना रोज समोर येत आहेत. उपाशी असणाऱ्यांना जेवण देण्यापासून ते रस्त्यांवर पायी चालत जाणाऱ्यांना त्यांच्या घरी पोहचवण्याचे काम दिल्ली पोलीस करत आहे.